Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत बैठक; २९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा!
मनोज जरांगे पाटील १६ : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे मराठा अभ्यासकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या जरांगे यांना ताप आणि इतर त्रास सुरू होता; मात्र अचानक उपचार अर्धवट थांबवत त्यांनी सराटी जवळ केली. त्यांच्या या भूमिकेने अनेकांना नवल आणि चिंता वाटली. गेल्या आठवड्यात त्यांनी सरकारविरोधात सातत्याने विधाने केली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसून आले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केल्याचा आरोप करत, त्यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीतून आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, शासकीय परिपत्रकातील जीआर आणि निर्णयातील कायदेशीर त्रुटी काय आहेत हे समजून घेण्यासाठी ते आज अभ्यासकांशी चर्चा करत आहेत. बैठकीदरम्यान “जीआर चुकला असं नंतर बोंबलता कशाला, काही चुकलं तर येऊन सांगा, सुधारणा असतील तर सुचवा. काय झालं आता, अजून कसं होत नाही?” असे सवाल करणाऱ्यांना जरांगे यांनी झोंबणारा सवाल केला. अभ्यासकांनी सन्मानाने यावे व सन्मानाने जावे, असे सांगताना ते म्हणाले की, “आपल्या समाजाचे खूप हाल करण्यात आले, चूक झाली असेल तर ती सांगा आपण दुरुस्त करू. सुधारणा केल्याने आपण मोठे होऊ, नाहीतर नाहक मोठी दरी निर्माण होईल.
तुमच्या आणि माझ्या भांडणात समाजाचे नुकसान होऊ नये.यावेळी अभ्यासकांनी हैदराबाद गॅझेटपासून ते सातारा गॅझेटपर्यंत, व्हॅलिडिटीचा विषय आणि ‘सगेसोयरे’ या मुद्द्यांचा उल्लेख जीआरमध्ये नसल्याबाबत आपली मते मांडून हरकती नोंदवल्या. जरांगे पाटील सरकारचे प्रतिनिधींशी बोलण्यापूर्वी या सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे. तसेच अभ्यासकांनी केवळ समाजासाठी यावे कोणताही ‘राजकीय अजेंडा’ म्हणून येऊ नये असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीसाठी अंतरवाली सराटीत स्त्री आणि पुरुषांची मोठी गर्दी उसळली आहे. प्रकृती ठीक नसल्याने दौरा अर्धवट सोडल्याचे सांगत जरांगे यांनी स्पष्ट केले की, तब्येत ठीक असल्यास ते विदर्भ आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. २९ ऑगस्टपूर्वी जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात आणि काय अपेक्षा व्यक्त करतात याकडे आता केवळ सरकारचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!
