Shahapur: लाडक्या बहिणी निराधार,ऑपरेटरच्या चुका, सिस्टीममधील घोळामुळे आधार कार्ड तूर्त स्थगित!
शहापूर १० : डिजिटल इंडिया’ आणि ‘कागदमुक्त कारभार’ असे कितीही मोठे दावे केले जात असले, तरी शासकीय यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी आणि ऑपरेटरच्या चुकांमुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आधार कार्डमधील जन्मतारीख, नावातील बदलांमधील तफावत आणि पत्त्यांच्या विसंगतीमुळे ४५ वर्षांवरील शेकडो महिला संजय गांधी निराधार योजना, रेशन, पेन्शन आणि इतर शासकीय लाभांपासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे.सन २००८ मध्ये आधार नोंदणी सुरू झाली, तेव्हा ऑपरेटरकडून अनेकांच्या वयाची नोंद अंदाजाने करण्यात आली होती. आता आधार कार्डवरील जन्मतारीख आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख यामध्ये फरक आढळल्याने शासकीय योजनेचे अर्ज थेट फेटाळले जात आहेत.
विशेषतः १९९० पूर्वी जन्मलेल्या महिलांकडे जन्मनोंद उपलब्ध नसल्याने त्यांना न्यायालयामार्फत ‘विलंबित जन्म नोंदणी’ करण्याचा वेळखाऊ आणि खर्चिक सल्ला दिला जात आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांना माहेरच्या नावाने गॅझेट करून नंतर सासरच्या नावाने आधार बदलण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, नाव आणि जन्मतारीख लागोपाठ बदलल्यामुळे ‘यूआयडीएआय’च्या (UIDAI) सिस्टीममध्ये संशय निर्माण होऊन संबंधित आधार कार्ड थेट ‘होल्ड’वर टाकले जात आहे. यामुळे सर्वसामान्य आणि अशिक्षित महिलांना दुरुस्तीसाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागत असून मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.याशिवाय, पिनकोडच्या सावळोगोंधळामुळे पत्त्यांमध्येही मोठी विसंगती निर्माण झाली आहे.
टपाल विभागाने २०१३ नंतर शहापूरचा जुना पिनकोड (४२१३०१) कल्याणसाठी वापरला आणि शहापूरसाठी ४२१६०१ हा नवीन पिनकोड लागू केला. परंतु आधार प्रणालीमध्ये हा बदल अद्यावत न झाल्याने बँकांचे एटीएम, विमा पत्रे आणि इतर महत्त्वाची सरकारी कागदपत्रे नागरिकांपर्यंत पोहोचतच नाहीत.या सर्व समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तालुका पातळीवर विशेष आधार सुधारणा शिबिरे आयोजित करावीत, ‘एक्सेप्शन केस’ म्हणून या प्रकरणांची तातडीने दखल घ्यावी आणि टपाल व आधार विभागाच्या डेटाचे सिंकिंग करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश हुलावले यांनी केली आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना न केल्यास बाधित महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे!
