Shivsena: ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आजच्या महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
ताज्या बातम्या न्यूज राजकारण

Shivsena: ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आजच्या महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Aug 18, 2026

शिवसेना १८ : शिवसेना पक्ष नाव आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्ह नक्की कोणाचे? या महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदारांच्या संख्येचे बहुमताचे कारण देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत ‘शिवसेना’ म्हणून घोषित केले होते आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह त्यांना बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची लागोपाठ सुनावणी झाल्याने लवकरच निकाल लागेल, असे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व वकील कपिल सिब्बल न्यायालयात जोरदार युक्तिवाद करणार आहेत.

यापूर्वी झालेल्या सुनावण्यांमध्ये सिब्बल यांनी, विधीमंडळ पक्षातील फूट ही मूळ राजकीय पक्षातील फूट मानली जाऊ शकत नाही आणि निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे, असा युक्तिवाद करत आयोगाच्या अधिकारांवरच प्रश्न उपस्थित केले होते.संघटनेतील बहुमत, पक्षाची मूळ घटना आणि पक्षप्रमुखांचे अधिकार डावलून केवळ आमदार-खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरवता येत नाही, असा दावा ठाकरे गटाने आपल्या याचिकेत केला आहे. त्यासोबतच शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयालाही ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या अंतिम सुनावणीच्या निकालावर असणार असून, यामुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय दिशा आणि दोन्ही गटांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय युक्तिवाद होतो आणि न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *