Abhijeet dipke :अभिजित दीपके यांना रामदास आठवले यांची खुली ऑफर आणि रिपब्लिकन ऐक्याची हाक!
ताज्या बातम्या राजकारण

Abhijeet dipke :अभिजित दीपके यांना रामदास आठवले यांची खुली ऑफर आणि रिपब्लिकन ऐक्याची हाक!

Aug 18, 2026

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिजित दीपके यांना पक्षात येण्याची थेट खुली ऑफर दिली आहे. अभिजित दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते असल्याने, त्यांनी कॉकरोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षात प्रवेश करून डॉ. बाबासाहेबांची चळवळ मजबूत करावी, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. दीपके यांच्यासारख्या नवतरुणांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवून, रिपब्लिकन पक्षाच्या युथ विंगचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. वेळ आल्यावर ते यासंदर्भात दीपके यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असून दीपके यांनीही यावर सकारात्मक विचार करावा, असे त्यांनी नमूद केले.यासोबतच आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या एकत्रीकरणावर भर दिला.

समाजात सध्या खोब्रागडे गट, गवई गट, आंबेडकर गट आणि आठवले गट असे वेगवेगळे गट अस्तित्वात आहेत. हे सर्व गट आणि नेते एकत्र आल्यास समाजात एक मोठी राजकीय व सामाजिक ताकद उभी राहील, ज्याचा उपयोग समाजाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रिपब्लिकन ऐक्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या एकत्रीकरणाचे नेतृत्व करावे आणि पक्षाचे अध्यक्ष व्हावे, अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

ऐक्याच्या मुद्द्यावर माझी भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास माझी कोणतीही हरकत नाही, तसेच ऐक्यासाठी चार पावले मागे हटण्याचीही माझी तयारी आहे, असे मोठे विधान त्यांनी केले. सध्या सर्व गट एकत्र आलेले नसले, तरी भविष्यात सर्व रिपब्लिकन नेते एकाच मंचावर येऊन मोठी ताकद निर्माण करतील, असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *