Sunetra pawar:काँग्रेसच्या ‘गूंगी गुडिया’ टीकेवर सुनेत्रा पवारांचे संयमी उत्तर; “वेळ आल्यावर नक्की बोलेन”
Sunetra pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या “गूंगी गुडिया” या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ “वेळ आल्यावर नक्की बोलेन,” एवढेच सांगत अधिक भाष्य टाळले.’गूंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग भारतीय राजकारणात नवा नाही. 1966 मध्ये समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत हा शब्द वापरला होता. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आपल्या नेतृत्वाच्या बळावर ‘आयर्न लेडी’ अशी ओळख निर्माण केली. आता काँग्रेसने हाच शब्दप्रयोग राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
हा वाद बीड दौऱ्यातील एका पत्रकार परिषदेनंतर सुरू झाला. पत्रकारांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता मंत्री धनंजय मुंडे यांनी तो प्रश्न थांबवल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा संदर्भ देत काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून, “सुनेत्रा पवार अजून किती दिवस गूंगी गुडिया बनून राहणार?” अशी पोस्ट करण्यात आली.या पोस्टनंतर महायुतीतील नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मंत्री धनंजय मुंडे यांनी काँग्रेसच्या मनात महिलांविषयी आदर नसल्याचा आरोप करत, हा महिलांचा अवमान असल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे म्हणजे राज्यातील महिलांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणानंतर अनेक महिला नेत्या आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला.दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संबंधित टिप्पणीबद्दल खेद व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेली टिप्पणी गैरसमजातून झाली असून महिलांचा सन्मान हा काँग्रेसचा कायमचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित पोस्ट ही वैयक्तिक नसून तत्कालीन घटनेच्या संदर्भात करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते तथा माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सार्वजनिक माफी मागावी आणि त्यांच्या वक्तव्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पत्रात काकडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा सन्मान जपण्याची परंपरा असल्याचे नमूद केले आहे. तसेच शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते म्हणून या प्रकरणात भूमिका घ्यावी, काँग्रेसने संबंधित वक्तव्याचा निषेध करावा आणि भविष्यात कोणत्याही महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरली जाणार नाही, यासाठी ठोस संदेश द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
