Dombivli: डोंबिवली पश्चिम येथील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा!
Dombivli ०४: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी रस्त्यावरील एका मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.पोलिसांना या मसाज सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय आणि भिवंडी येथील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. बुधवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
कारवाईदरम्यान मसाज सेंटरमधून २२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच व्यवस्थापकास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चार पीडित तरुणींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील काही मसाज सेंटरच्या आड अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत निजामपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, हवालदार एस. डी. घुगे, अंकिता भोईर, अनिल साप्ते तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
