Thane: आतकोलीतील दगडखाणप्रकरणी गुन्हे दाखल करा…राष्ट्रवादी (श.प.) ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; 12 हजार कोटींची राॅयल्टी चोरी… समृध्दी महामार्गासह पिसे धरणाला धोका … जलसाठादेखी खालावला!
ठाणे – भिवंडी तालुक्यातील आतकोली पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे दगड खाणींचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननातून कोट्यवधी रूपयांची राॅयल्टी बुडविण्यात आली आहे. तसेच, दगडखाणींसाठी बेकायदेशीरपणे स्फोटकांचा साठाही केला जात आहे. त्यामुळे एखादी एंटलियासारखी घटना घडू शकते, ही बाब ध्यानात घेऊन अनधिकृत दगडखाणी चालविणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची भेट घेऊन केली.
मागील आठवड्यात मनोज प्रधान यांनी आतकोली परिसरात पाहणी दौरा केला होता. या दौर्यात बेकायदेशीर दगडखाणीतून गौण खनिजांची चोरी केली जात असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रधान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रधान यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे जिल्ह्यातील मौजे आतकोली, ता. भिवंडी पंचक्रोशीत बेकायदेशीरपणे दगडखाणी सुरू होत्या. मौजे आतकोली येथील ३४ हेक्टरची ही जागा सन २०२४ मध्ये ठामपाच्या ताब्यात आली आहे. 84.2 एकरच्या या भूखंडावर आजही दगडखाण होत्या. गेल्या काही महिन्यात अंदाजे 30 फूट खोदकाम केले आहे.
याचे गणित बांधल्यास एकरामागे किमान 4.5 कोटी ब्रास दगड चोरण्यात आला असावा, त्याची 12 हजार कोटींची राॅयल्टी सरकार दरबारी जमाच करण्यात आलेली नाही. याच परिसरातील गुरचरण महाराष्ट्र सरकार (10) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (13) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (14) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (3) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (4) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (5)[222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (63) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (69/2) [222], गुरचरण महाराष्ट्र सरकार (9) [222] या भूखंडावर बेकायदेशीर दगडखाणी सुरू आहेत.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (GSDA) अहवालानुसार ठाणे जिल्ह्यातील एकूण भूजल उपसा हा सुरक्षित मर्यादेत (१९ टक्के) असला, तरी भिवंडी सारख्या वेगाने शहरीकरण होणाऱ्या भागात उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत झपाट्याने आटत आहेत. त्यामागे दगडखाणी हे मुख्य कारण आहे. या दगडखाणी ज्या परिसरात आहेत. त्या भागात नद्या वहात आहेत. शिवाय, पिसे धरणही आहे. दगड चोरण्यासाठी मोठ्याप्रमाणात खोलवर खोदले जात असल्याने इतरत्र असलेल्या जलस्रोतांमध्ये कमालीची घट झाली आहे. या दगडखाणींसाठी मोठ्याप्रमाणात जिलेटीन कांड्यांसह इतर स्फोटकांचा वापर केला जात आहे.
या परिसरातूनच मुंबई- नागपूरला जोडणारा अतिशय महत्वाचा समृद्धी महामार्ग जात आहे. या महामार्गाला तसेच शेजारी असलेल्या पिसे धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. या दगडखाणी बेकायदेशीर असून या दगडखाणीतून निघालेले गौण खनिज कोणाला विकले जाते किंवा त्या गौण खनिजाचा वापर कुठे केला जात आहे, याचा शोध घ्यावा आणि या दगडखाणी आगामी 48 तासात कायमस्वरूपी बंद करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे. या खाणी बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा प्रधान यांनी दिला आहे!
