Thane: ठाण्यात मुंबई ३च्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता!
ठाणे १४ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या ‘मुंबई ३’ च्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.मुंबईत आधीच १०% पाणीकपात लागू असताना ही गळती झाल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
जर ही दुरुस्ती वेळेत पूर्ण झाली नाही तर सामान्य लोकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर ही गळती त्वरित थांबवून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान आहे.दरम्यान, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या ८८.८१% म्हणजेच १२.८५ लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा पुढील वर्षाच्या ७ एप्रिलपर्यंत पुरणारा आहे. जुलै महिन्यात पावसाची स्थिती बिकट असल्याने १०% पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर झालेल्या चांगल्या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी ऑगस्ट महिन्यातील पावसाचा आढावा घेऊनच ही पाणीकपात मागे घ्यायची की नाही, याबाबतचा पुढील निर्णय महापालिका प्रशासन घेणार आहे!
