ठाणे ०८ : ठाण्यातील कासारवडवली परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. येथील एका २३ मजली इमारतीमध्ये ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कासारवडवली येथील ‘तरंगण सोसायटी’मध्ये १४ व्या मजल्यावर राहणारे विद्यासागर एम. व्ही. (वय ७२) यांनी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील डक्ट परिसरात लाकडी बांधकामाच्या आधाराला बेडशीट बांधून गळफास लावून घेतला.घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस, ठाणे महापालिकेचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्कायलिफ्ट, अग्निशमन बंब आणि इतर बचाव साहित्याचा वापर करून सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह डक्टमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे!
