Thane: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ठामपा विद्यार्थ्यांनी केला देशभक्तीचा जागर!
ठाणे

Thane: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ठामपा विद्यार्थ्यांनी केला देशभक्तीचा जागर!

Aug 13, 2026

ठाणे १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहात मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे सभागृहात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, उपायुक्त दीपक झिंजाड, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, गटअधिकारी संगीता बामणे यांच्यासह मनपा शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने तिरंगा राखी अभियान, सीमेवरील जवानांना पत्र, सायकल तिरंगा रॅली यांसह विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, पथनाट्य आणि फ्यूजन सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. शाळा क्रमांक 112 मधील विद्यार्थ्यांनी ‘माँ से है माटी, माँ से है तिरंगा’ या विषयावर आधारित सादरीकरण केले. शाळा क्रमांक 29 मधील विद्यार्थ्यांनी ‘बढ़ते चलो’ या गीतावर देशभक्तीपर सादरीकरण केले. शाळा क्रमांक 6 मधील विद्यार्थ्यांनी ‘तिरंगा’ या गाण्यावर नृत्य सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. शाळा क्रमांक 126 मधील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे महत्त्व आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर यांचा संदेश देण्यात आला.

शाळा क्रमांक 98 मधील विद्यार्थ्यांनी ‘ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू’ या गीताचे सादरीकरण केले. शाळा क्रमांक 53 मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर फ्यूजन साँग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तर शाळा क्रमांक 73 मधील विद्यार्थ्यांनी ‘देस रंगीला’ या गीतावर आकर्षक नृत्य सादर केले. यासोबतच मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या या विविधांगी सादरीकरणातून देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास, राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि मातृभूमीविषयीची कृतज्ञता यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ राष्ट्रध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न ठेवता देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देण्यात येत आहे. सीमेवरील जवानांना पत्र लिहिणे, तिरंगा राखी तयार करणे तसेच सायकल तिरंगा रॅली यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा या राष्ट्रीय अभियानातील सहभाग अधिक व्यापक झाला असल्याचे नमूद करीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्वाना 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशभक्तीपर कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने ठाणे शहरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला. ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात देशप्रेम हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक सुरेश पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *