Thane: ठाणे महापालिका रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात आढळले झुरळ; रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!
अन्न सुरक्षा ताज्या बातम्या

Thane: ठाणे महापालिका रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात आढळले झुरळ; रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

Sep 2, 2026

Shivaji hospital: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णाच्या रात्रीच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. २८ ऑगस्टला रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात हे झुरळ आढळले. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या जनहित व विधि विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह तत्काळ रुग्णालय गाठून प्रशासनाला जाब विचारला.

या रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात आणि दररोज सुमारे एक हजाराहून अधिक रुग्णांना जेवण पुरवले जाते. मात्र, या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या घटनेवर बोलताना मनसे विधि विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू असताना ठाण्यातील सरकारी रुग्णालयात एवढा गंभीर प्रकार घडूनही अन्न व औषध प्रशासन का गप्प बसले आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच रुग्णालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची व साठवणुकीची संपूर्ण प्रक्रिया अन्न सुरक्षा मानकांनुसार तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. स्वप्नाली कदम यांनी सांगितले की, घटनेबाबतची चौकशी सध्या सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबाबदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *