ठाणे १० : ठाण्यात विद्यार्थ्यांचा ड्रग्स व्हिडिओ व्हायरल; शिंदेसेनेची शिक्षक व व्यवस्थापनावर कारवाईची मागणी!ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका खाजगी शाळेतील दोन विद्यार्थी बाकावर बसून कथित अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ‘शाळेच्या परिसरात अमली पदार्थ पोहोचलेच कसे?’ आणि ‘शाळेतील सुरक्षा यंत्रणा व शिक्षक नक्की काय करत होते?’ असा सवाल उपस्थित करत परिसरात ड्रग्स रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे.
या गंभीर घटनेनंतर शिंदेसेना आक्रमक झाली आहे. वागळे इस्टेट विभागप्रमुख एकनाथ भोईर यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ मुलांवरच नव्हे, तर हलगर्जीपणा करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावरही कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. शाळा व्यवस्थापनाने यात निष्काळजीपणा दाखवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भोईर आणि संतप्त पालकांनी दिला आहे!
