Thane: नितीन उड्डाणंपुलाचं “नाना शंकर शेट” नामकरणाचा ठराव महासभेत मंजूर!
ठाणे, दि. १८ – भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार,थोर समाजसुधारक आणि ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र नामदार नाना शंकरशेट यांचे नाव ठाण्याच्या महामार्गावरील नितीन उड्डाणपुलाला देण्याचा ठराव काल झालेल्या महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. ठाणे महापालिकेने नानांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करून त्यांच्या स्मृती चिरंतन केल्याने ठाण्यासह मुंबईतील नानाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.नितीन कंपनी महामार्गावरील असलेल्या शहरातील मध्यवर्ती उड्डाणपुलाला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, यासाठी ज्येष्ठ पत्रकार व ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे हे गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करीत होते.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर ची मागणी करून शासनाकडे याबाबतचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. परिवहन मंत्री मा.प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सुद्धा या नामकरणाच्या मागणीला दुजोरा देत या बाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. शासन स्तरावरती सुद्धा या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याची अंमलबजावणी झाली नव्हती म्हणून पितळे यांनी सदर नामकरण ठाणे महानगरपालिकेने ठरावाद्वारे करावे अशी मागणी पुन्हा उपमुख्यमंत्र्यांकडे केली असता त्यांनीही सहमती दर्शवली होती.शिवसेना गटनेते पवन कदम यांनाही निवेदन दिले होते.
सदर मागणीची दखल घेत पवन कदम यांनी प्रस्तावाची सूचना सादर केली होती.या सूचनेवर सभागृहनेते हणूमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिलं होतं . सदर प्रस्तावाची सूचना काल झालेल्या महासभेत सर्वांनुमते मंजूर झाली आहे.ठाणे महापालिकेने नितीन उड्डाणपुलाला नाना शंकरशेट यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा, अशी मागणी पितळे यांनी लावून धरली होती. आज अखेर त्यास यश आले असून या पुलाला नानांचे नाव देण्याचा ठराव एकमुखाने ठाणे महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला असल्याने नितीन कंपनी समोरील पुलाचं नामकरण” नाना शंकर शेट” उड्डाण पूल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
