Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026…ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करावे!
ठाणे (20) : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत महापालिका शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करण्याचे आवाहन उपायुक्त मीनल पालांडे यांनी आज झालेल्या बैठकीत शिक्षकांना केले. ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या सूचनेनुसार आज महानगरपालिका शाळा व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गट अधिकारी संगीता बामणे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कृष्णकुमार कोळी, अशोक आहेर, परिवहन सेवेचे अधिकारी तसेच मनपा व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘धाव प्रगतीची.. गतीशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. 30 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका भवन येथून शालेय मुलांच्या स्पर्धेला सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 12 वर्षाखालील आणि 15 वर्षाखालील मुले मुली गट असून या वयोगटातील मुलांना मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी करण्याच्या सूचना उपायुक्त मीनल पालांडे यांनी शिक्षकांना दिल्या. तसेच सर्व विद्यार्थी महापालिका भवन येथे पोहचतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी परिवहन विभागाच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणाहून सुरक्षितपणे स्पर्धेच्या ठिकाणी आणणे तसेच स्पर्धा संपल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान तसेच स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत शिक्षकांची देखरेख राहणार असून, विद्यार्थी स्पर्धेसाठी घराबाहेर पडल्यापासून ते स्पर्धा संपल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शिक्षकांची असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणताही आजार अथवा आरोग्याशी संबंधित त्रास आहे, अशा विद्यार्थ्यांना मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनीही आपल्या पाल्याच्या आरोग्याची योग्य ती खात्री करूनच त्याला स्पर्धेसाठी पाठवावे असेही या बैठकीत नमूद करण्यात आले. या बैठकीस ठाणे शहरातील महानगरपालिका व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
