Thane: तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर; ओवळा-माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रा..आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वर्तकनगरात उत्साह; ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात!
ठाणे ताज्या बातम्या न्यूज

Thane: तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर; ओवळा-माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रा..आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वर्तकनगरात उत्साह; ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात!

Aug 13, 2026

ठाणे १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेत नागरिकांनी परिसरातून मार्गक्रमण करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रतीची निष्ठा अधिक दृढ करण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला.

‘हर घर तिरंगा’ अभियान केवळ प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यापुरते मर्यादित नसून, तिरंग्याशी जोडलेली देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याच भावनेतून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला.यात्रेत श्री साईबाबा मंदिर संस्थान, भारत विकास परिषद, चिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष निमंत्रित मेजर शशिकांत साळुंखे आणि मेजर गणेश वालावलकर यांची उपस्थितीही नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली.यावेळी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.

तिरंगा हा देशाच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका स्नेहा आंब्रे, अनिता ठाकूर, आशा देवी बहादूर सिंग, ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष राम ठाकूर, श्रुती महाजन-कोंगनोळीकर, रमेश आंब्रे यांच्यासह मंडल पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.तिरंगा यात्रेच्या आयोजनासाठी नगरसेवक वैभव कदम आणि राजेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तिरंग्याचा सन्मान, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना घराघरात पोहोचविण्याचा संदेश देत ही यात्रा उत्साहात पार पडली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *