Thane: धाव प्रगतीची…गतीशील ठाण्याची..’32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 च्या कक्ष कार्यालयाचे…महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन!
ठाणे १३ – ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 च्या कक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते झाले. ‘धाव प्रगतीची.. गतीशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, दीपक झिंजाड, मनिष जोशी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील ठाणे महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील कै. अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कोविडनंतर गेल्यावर्षी महापालिका प्रशासनामार्फत ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी सात वर्षानंतर ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्हयातील शालेय विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसेच स्पर्धकांना माहीती मिळावी व संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे, तसेच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यत विविध गटात ही स्पर्धा होणार आहे.
नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच क्रिडाविषयक जागरुकता वाढली पाहिजे हा या मागचा हेतू असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, गटनेते पवन कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना चेस्ट नंबरचे वाटप करण्यात आले.या स्पर्धेत 30 हजाराहून नागरिक, ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेलिब्रेटी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.
