Thane: नऊ थरांचा थरार; ‘खोपटचा राजा’ची दहीहंडीवर बाजी…नशामुक्ती युवा, हाच मोदीजींचा ध्यास!
ठाणे : श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा गोपाळ काला उत्सव ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या विद्यमाने आयोजित या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजक श्री. कृष्ण दादू पाटील, उपमहापौर तथा अध्यक्ष, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सौ. नंदा कृष्ण पाटील, नगरसेवक, होते.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर तसेच आमदार व प्रदेशाध्यक्ष, महिला मोर्चा महाराष्ट्र चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ठाणे महापौर शर्मिला पिंपोळकर यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात दहीहंडी फोडण्याच्या थराराला सुरुवात झाली.
यावेळी ‘नशामुक्ती युवा, हाच मोदीजींचा ध्यास’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून युवकांना नशामुक्तीचा संदेश देण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. गणेशच्या गाण्याने नृत्य कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी दमदार सहभाग नोंदविला. मानवी मनोरे रचताना गोविंदांचा उत्साह, सांघिक समन्वय आणि जिद्द यामुळे परिसरात चांगलाच थरार निर्माण झाला. अखेर ‘खोपटचा राजा’ या गोविंदा पथकाने तब्बल नऊ थरांचा मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.
या शानदार कामगिरीबद्दल पथकाला साडेपाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.नऊ थरांचा मनोरा रचत छत्रपती गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनीही दमदार कामगिरी केली. या पथकाने दुसरा क्रमांक पटकावत २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. दोन्ही पथकांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे दहीहंडी सोहळ्यातील उत्साह आणखी वाढला.
या भव्य सोहळ्यास आजी-माजी खासदार, आमदार, सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारी, पोलीस अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष रंगत आली.
नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदा पथकांच्या थरारक प्रयत्नांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांची गर्दी, ढोल-ताशांचा निनाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रीकृष्णाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला.धार्मिक उत्सवाला सामाजिक संदेश, सांस्कृतिक परंपरा आणि सांघिक एकतेची जोड देणारा हा भव्य दहीहंडी सोहळा ठाणेकरांसाठी संस्मरणीय ठरला.सायंकाळी ७.३०. पर्यंत ५१ पुरुष गोविंदा पथकानी हजेरी लावली तर महिला २३ गोविंदा पथकानी हजेरी लावली!
