ठाणे, दि. १३(जिल्हा परिषद, ठाणे): राज्यातील गुणवंत, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, अभ्यासाची गोडी आणि गुणवत्ता वाढीस लागावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी स्तर) यांचा निकाल दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत या परीक्षेसाठी एकूण ९,०८३ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात आले होते.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी महत्त्वपूर्ण परीक्षा असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक व प्रोत्साहनात्मक आधार मिळावा, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची प्रेरणा मिळावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
४ थी व ७ वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालानुसार इयत्ता ४ थीमध्ये एकूण ४६० विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी १७४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तसेच इयत्ता ७ वीमध्ये १७६ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी १०० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
तालुकानिहाय निकालाचा विचार करता शहापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इयत्ता ४ थीमध्ये शहापूर तालुक्यात २७१ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी १२२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता ७ वीमध्ये १२४ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी ७३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
मुरबाड तालुक्यात इयत्ता ४ थीमध्ये १३ विद्यार्थी पात्र असून ३१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, तर इयत्ता ७ वीमध्ये ३३ विद्यार्थी पात्र असून १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. भिवंडी तालुक्यात इयत्ता ४ थीमध्ये ५५ विद्यार्थी पात्र व ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, तर इयत्ता ७ वीमध्ये १० विद्यार्थी पात्र व ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. कल्याण तालुक्यात इयत्ता ४ थीमध्ये २८ विद्यार्थी पात्र व ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, तर इयत्ता ७ वीमध्ये ४ विद्यार्थी पात्र व १ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला आहे. अंबरनाथ तालुक्यात इयत्ता ४ थीमध्ये १३ विद्यार्थी पात्र व ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, तर इयत्ता ७ वीमध्ये ५ विद्यार्थी पात्र व ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
जिल्हा गुणवत्ता यादीतही जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची नोंद
शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीमध्येही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इयत्ता ४ थीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत एकूण १०, २८० तसेच शहरी सह अन्य ४९५ अशा विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील अनुक्रमे ९, १६३ आणि २ विद्यार्थी असल्याची नोंद आहे.
तसेच इयत्ता ७ वीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत एकूण १०, २२९ तसेच शहरी सह अन्य ४५२ विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील अनुक्रमे ५, ७८ आणि १७ विद्यार्थी असल्याची नोंद आहे.
‘शहापूर पॅटर्न’चा सकारात्मक परिणाम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांचा नियमित सराव, मार्गदर्शन आणि परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम यंदाच्या निकालातून दिसून येत आहे.
विशेषतः शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी राबविण्यात आलेल्या ‘शहापूर पॅटर्नचा प्रभाव निकालातून स्पष्टपणे दिसून येत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन व सराव उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे.
“शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व स्पर्धात्मकतेला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत केलेली उल्लेखनीय कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. विद्यार्थ्यांना अशा स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन, सराव आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी शिक्षण विभागामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी व्यक्त केला.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे तसेच पालकांचे जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
