Thane: उपवन येथील रिंग मेट्रोबाधित २९ उद्योजकांना दिलासा..उद्योग त्याच भागात प्रस्थापित करण्याचे अधिकाऱ्यांनी केले मान्य!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: उपवन येथील रिंग मेट्रोबाधित २९ उद्योजकांना दिलासा..उद्योग त्याच भागात प्रस्थापित करण्याचे अधिकाऱ्यांनी केले मान्य!

Aug 13, 2026

ठाणे १३ : गेली ५० वर्षे उपवन येथे व्यवसाय करणारे रिंग मेट्रोबाधित २९ उद्योग त्याच भागात प्रस्थापित करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. प्रकल्पाला चार महिने उशीर झाला तरी चालेल, पण नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा, या दृष्टीने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही मेट्रो अधिकाऱ्यांना केल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून याबाबत विविध विभागांतून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी करून सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक बदलही काही ठिकाणी करण्यात आले आहेत.

उपवन येथे गेली ४०-५० वर्षांपासून व्यवसाय करणारे उद्योजक देखील या प्रकल्पात बाधित होणार असल्याने त्यांनी श्री. केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या होत्या. आज मेट्रो कार्यालयात श्री. केळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी हिरानंदानी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी, लाझरस रोड, उपवन येथील नागरीक आणि उद्योजक आणि वेक अप ठाणे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपवन येथील २९ उद्योजकांना त्याच भागात प्रस्थापित करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे या उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.याबाबत माध्यमांशी बोलताना श्री.केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या परवानग्या घेण्याआधी नागरीकांच्या हरकती-सूचना घेणे आवश्यक होते. मात्र काम सुरू केल्यानंतर सूचना स्वीकारल्या जात आहेत.

एकवेळ प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल पण कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टीने प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.सध्या ठाणे शहराची लोकसंख्या २९लाखांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात नागरिकरणामुळे लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्या दृष्टीने आतापासूनच विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र या योजना सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्याची गरजही श्री. केळकर यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *