Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धडक मोर्चा आता शाळांकडे, विद्यार्थ्यांना जेवण पुरवणाऱ्यांसाठी लावले कडक नियम!
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन व पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आता अधिक सतर्क झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी शाळांना जेवण पुरवणाऱ्या संस्था, बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि कंत्राटदारांसाठी कडक नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे अन्न सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार असावे, यासाठी अन्न तयार करण्यापासून ते साठवणूक, वाहतूक आणि वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वयंपाकगृहांची स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक आणि स्वच्छ पद्धतीने वितरण यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळणे, आवश्यक संरक्षणात्मक साहित्याचा वापर करणे तसेच अन्न हाताळणीबाबत प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे. अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण च्या नियमांचे पालन करणेही सर्व संबंधितांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
एफडीएकडून वेळोवेळी अचानक तपासण्या करण्यात येणार असून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा पुरवठादारांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळावा तसेच अन्नातून होणारे आजार टाळावेत, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले!
