UPSC – MPSC”गुणवंतांचा शिवसेना व तेजपर्व तर्फे MCA-BKC येथे भव्य सत्कार; राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा सोहळा!
मुंबई ०३ : शिवसेना, तेजपर्व सामाजिक संस्था आणि सुगी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) २०२५ – २६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा शनिवारी बीकेसी येथील एमसीए क्रिकेट क्लब रिक्रिएशन सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार दिलीप (मामा) लांडे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार पराग अळवणी, शिवसेना सचिव तथा शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात, शिवसेना उपनेते राजाभाऊ चौगुले, शिवसेना उपनेत्या आशाताई विचारे-मामिडी, नगरसेविका मिनलताई संजय तुर्डे, शिवसेना राष्ट्रीय सह-समन्वयक दिनेश शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी UPSC आणि MPSC परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख मा. एकनाथ शिंदे यांनी पाठविलेली अभिनंदन व गौरवपत्रेही प्रदान करण्यात आली. या संदेशामध्ये विद्यार्थ्यांच्या परिश्रम, चिकाटी, शिस्तबद्ध अभ्यास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचे कौतुक करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सोहळ्यात UPSC परीक्षेतील AIR 26 मिळविणाऱ्या सुमती कदम, AIR 31 चे सुशांत वडवकर, AIR 44 चे अदिश तिवारी, AIR 46 ची मोहिनी जगताप, AIR 69 चे रोहित पवार, AIR 81 चे अक्षय पवार, AIR 94 चे शुभम पाटील, AIR 102 चे दर्शन सूर्यवंशी, AIR 106 ची ऋतुजा गायकवाड यांच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच MPSC राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या पवन मंगरुळे, DYSP/ACP पदावर निवड झालेल्या मनीषा खेडेकर आणि Group B व C परीक्षेत यशस्वी झालेल्या रुचा खैरनार यांचाही विशेष गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले.
प्रारंभी विनित गोरे प्रस्तुत “शब्दप्रभू” या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर आणि गुलजार यांच्या अजरामर गीतांचा सुरेल स्वराविष्कार सादर करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, प्रामाणिक प्रशासन, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले.या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन शिवसेना सचिव, तेजपर्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुधाकर शंकर तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. गेली १८ वर्षे UPSC व MPSC परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना समाजासमोर आदर्श म्हणून उभे करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
