Vinyak raut : जादूटोणा अन् कौटुंबिक छळ प्रकरण: माजी खासदार विनायक राऊतांसह ६ जणांना अटकपूर्व जामीन!
ताज्या बातम्या न्यूज राजकारण

Vinyak raut : जादूटोणा अन् कौटुंबिक छळ प्रकरण: माजी खासदार विनायक राऊतांसह ६ जणांना अटकपूर्व जामीन!

Aug 8, 2026

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात दाखल गुन्ह्यात ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी विनायक राऊत आणि त्यांच्या पुत्रासह एकूण सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यांनी आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले होते, ज्याच्या आधारे पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचारासह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.

या संपूर्ण प्रकरणात विनायक राऊत, गितेश राऊत आणि दोन कथित भोंदू बाबांसह एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जलद कारवाई करत फिरोज शेख आणि त्याच्या एका साथीदाराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून आधीच अटक केली होती.

दरम्यान, या प्रकरणात संभाव्य अटक टाळण्यासाठी राऊत पिता-पुत्रांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, जिथे न्यायालयाने अर्जावर सुनावणी घेत त्यांना दिलासा दिला!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *