अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; निवडणूक आयोग, कर अधिकाऱ्यांना पत्र!
अभिजित दीपके ०२ : कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी निवडणूक आयोगासह आयकर आणि इतर संबंधित कर अधिकाऱ्यांना पत्र पाठवत ही मागणी केली आहे. तिवारी यांनी आपल्या पत्रात, महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचारी भगवान दिपके यांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी कसा उपलब्ध करून दिला, याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. तसेच, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी सीजेपीच्या कायदेशीर संरक्षण निधीसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या देणगीचीही तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सीजेपीच्या नोंदणीबाबतही उपस्थित केले प्रश्न:-अमित तिवारी यांनी सीजेपी ही अधिकृतपणे नोंदणीकृत संघटना आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.
जर संघटना नोंदणीकृत नसताना राजकीय पक्षाप्रमाणे कार्य करत असेल किंवा निधी उभारत असेल, तर त्या संदर्भात निवडणूक आयोगाने पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.याशिवाय, कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या देणगीवर जीएसटीसह इतर कर नियम लागू होतात का, याबाबतही केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाकडे स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोण आहेत अभिजीत दिपके?
३० वर्षीय अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरचे डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बेरोजगारांचा उल्लेख “कॉकरोच” असा केल्यानंतर अभिजित दिपके यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली. पुढे या मोहिमेचे रूपांतर नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात झाले. या आंदोलनात अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक हे प्रमुख चेहरे म्हणून समोर आले.
विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर संरक्षण निधी:
२७ जुलै रोजी सीजेपीने पेपरफुटी प्रकरणात कारवाईला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी विशेष निधी उभारण्याची घोषणा केली होती. या निधीसाठी ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी १ कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले असून, देशभरातील वकिलांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितले की, विविध राज्यांतील आंदोलक विद्यार्थी आणि त्यांच्याविरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कायदेशीर यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी देशभरातील वकिलांचे सहकार्य घेतले जाईल.याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल झाले आहेत, त्यांची माहिती आणि त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र वेबसाइटही तयार करण्यात येणार असल्याचे कपिल सिबल यांनी सांगितले.
