कल्याण ०१ : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात एका युवकाला काही तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा तृतीयपंथीयांचा वेश धारण करून नागरिकांकडून पैसे उकळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याच कारणावरून काही तृतीयपंथीयांनी त्याला पकडून मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणाबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.या घटनेनंतर कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, स्टेशन परिसरात अनेक अवैध प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. रेल्वे यार्ड, स्कायवॉक तसेच निलम गल्ली परिसरात संशयास्पद हालचाली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यापूर्वी पोलिसांनी या भागात कारवाई केली होती, मात्र काही काळानंतर पुन्हा अवैध प्रकार सुरू झाल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातही पुरुषांनी तृतीयपंथीयांचा वेश परिधान करून नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता कल्याणमधील ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांकडे पैसे मागण्याच्या घटनांबाबतही प्रवाशांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.
