पुण्यात पावसाचा जोर ओसरला; पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज, धरणसाठा ९८ टक्क्यांवर!
पुणे ०२: पुणे शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरींची हजेरी लागली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रविवारी घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले आणि छत्तीसगड तसेच विदर्भ परिसरावर सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता कमकुवत झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी सकाळी काही वेळ ऊन पडले, मात्र त्यानंतर ढग दाटून आले आणि शहरातील विविध भागांत हलक्या सरी बरसल्या.
दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने वातावरणात गारवा जाणवला. संध्याकाळी पाऊस कमी झाल्याने नागरिकांनी बाजारपेठांकडे आणि इतर कामांसाठी बाहेर पडण्यास सुरुवात केली. रात्री काही भागांत पुन्हा हलक्या पावसाने हजेरी लावली.शनिवारी शहराचे कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवस तापमानात विशेष बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात पुढील आठवड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
महिनाभरापूर्वी अवघा ३.६६ टीएमसी असलेला साठा आता तब्बल २८.६१ टीएमसीपर्यंत पोहोचला असून, धरणसाखळी ९८ टक्क्यांहून अधिक भरली आहे. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचीही वर्षभराची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांपैकी खडकवासला आणि वरसगाव धरणे शनिवारी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणांची सुरक्षितता लक्षात घेऊन आतापर्यंत सुमारे सहा टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या सलग पावसामुळे धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून, जलसाठ्यात झालेली ही वाढ पुणेकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.
