भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास दिली मंजुरी; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन….पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला होणार फायदा,   खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश! 
वाहतूक

भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास दिली मंजुरी; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन….पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला होणार फायदा,   खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश! 

Aug 1, 2026

नवी दिल्ली ०१ – ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिली आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही नवीन ट्रेन सुरु झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कोकणवासियांच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत.

 कोकण रेल्वेच्या सेवेबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेसंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सोडण्याची प्रमुख मागणी केली होती. ही मागणी आज मान्य झाली आहे. त्यासंदर्भात केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या pib वेबसाईट वर त्याची घोषणा करण्यात आली आहे. मागणी मान्य झाल्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आनंद व्यक्त केला आहे.  

महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासी कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी, भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नवीन सेवेमुळे ५१० किलोमीटरच्या मार्गावर थेट, सोयीस्कर आणि विश्वसनीय रेल्वे जोडणी उपलब्ध होईल, ज्यामुळे पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक उद्देशांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावांनी दररोज धावेल. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. 

नवीन दैनिक एक्सप्रेसचे थांबे दादर, ठाणे, पनवेल, पण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण,  सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड , वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोंकणातील प्रमुख शहरांमध्ये अखंड रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या नव्या सेवेचा मोठा फायदा कोंकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळांना होणार आहे. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. तसेच विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे आणि दैनंदिन प्रवाशांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

प्रादेशिक विकासाला गती या ट्रेनमुळे मिळणार असून कोंकण विभागातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवास सुलभ होऊन लोकांची ये-जा वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना देखील फायदा होणार आहे. कोंकण मार्गावरील वाढती प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. ही नवीन एक्सप्रेस सेवा रेल्वेच्या प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि देशातील संतुलित प्रादेशिक विकास साधण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *