भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल!
भिवंडी इमारत दुर्घटना : बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल!भिवंडीतील गंगारामवाडी परिसरात घडलेल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त फैजल तातली यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री हा गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान (मुंबई) यांनी संबंधित इमारतीचे बांधकाम करताना महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली नव्हती. तसेच ही इमारत अनधिकृत असल्याचेही तपासात समोर आले आहे.दरम्यान, इमारतीच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव अशोक असल्याचे समोर आले असले, तरी त्याचे संपूर्ण नाव व इतर माहिती अद्याप पोलिसांकडे उपलब्ध नाही. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांमध्ये अशोक पासवान यांचा समावेश असल्याने, गुन्हा नेमका कोणत्या अशोकविरुद्ध दाखल करण्यात आला आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते यांनी सांगितले की, दुरुस्ती करणारा ठेकेदार आणि मृत्यू झालेला अशोक पासवान ही एकच व्यक्ती आहे की वेगळी, याचा तपास सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.उल्लेखनीय म्हणजे, ही इमारत गुरुवारी रात्री कोसळून भीषण दुर्घटना घडली होती.
