मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!

Jul 29, 2026

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी २९ ऑगस्टपासून शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला २९ ऑगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतरही ५८ लाख कुणबी नोंदी असलेल्या पात्र नागरिकांना अद्याप प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. सरकारने २८ ऑगस्टपर्यंत संबंधितांना प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा २९ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

मराठा समाजाला सातत्याने न्यायापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी गेली तीन वर्षे संघर्ष सुरू असल्याचे नमूद केले. स्थानिक चौकशी अहवालासह विविध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही मराठा समाजालाच लक्ष्य केले जात असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.हैदराबाद गॅझेटच्या आधारे पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत, समाजातील ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी उपलब्ध आहेत त्यांनी तातडीने प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

२९ ऑगस्टचे आंदोलन आरक्षणाच्या लढ्यातील निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे सांगत त्यांनी समाजातील प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करणाऱ्या नऊ मंत्र्यांची नावे २९ ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.यावेळी त्यांनी स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही पुन्हा एकदा पुढे केली. केवळ उपसमितीच्या बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *