लोकमान्य टिळकांनी दिला स्वराज्याचा मंत्र; तर मोदी-शहा यांनी जगाला दिला सुरक्षेचा मंत्र-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!
पुणे, दि. १ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत आहे. राष्ट्रनिष्ठा, निर्णायक नेतृत्व आणि सक्षम सुरक्षा व्यवस्थेच्या बळावर भारत अधिक आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर उभा राहिला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.भाषणाच्या प्रारंभी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अभिवादन केले.
एक ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारामुळे विशेष महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी या सोहळ्याला अनेक वेळा उपस्थित राहण्याची संधी लाभल्याचे नमूद केले. २०२३ मध्ये हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता, तर यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसह अनेक मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव झाला असल्याची आठवण त्यांनी करून दिली.यावर्षी या गौरवशाली परंपरेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करत शिंदे म्हणाले, “ज्या पुण्यभूमीवर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला, त्याच पुण्यात देशाच्या सुरक्षेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होत आहे. यापेक्षा मोठा अभिमान दुसरा असू शकत नाही.””लोक म्हणतात, नावात काय आहे? पण मी म्हणतो, ‘अजित डोवाल’ हे नावच पुरेसे आहे.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्यावतीने मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असे सांगत त्यांनी डोवाल यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांचा होत असलेला सन्मान हा “दुग्धशर्करा योग” असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “एका बाजूला देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नवी दिशा देणारे, नक्षलवाद, दहशतवाद आणि देशविघातक शक्तींवर निर्णायक प्रहार करणारे अमित शहा आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या सीमांचे अभेद्य संरक्षण करणारे, राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला नवी ताकद देणारे रणनीतीकार अजित डोवाल आहेत. हा एका महान व्यक्तीने दुसऱ्या महान व्यक्तीचा केलेला सन्मान नसून राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसुरक्षेच्या विचाराचा गौरव आहे.”यावेळी लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. ब्रिटिश सत्तेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र गुप्त माहितीचे समांतर जाळे उभे केले होते. ब्रिटिश प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांच्या कारवायांची माहिती त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचत असे. स्वराज्याच्या लढ्यात त्यांनी उभारलेले हे ‘काउंटर इंटेलिजन्स नेटवर्क’ त्या काळातील राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाचे प्रतीक होते. आज आधुनिक भारताची गुप्तचर यंत्रणा ज्या कार्यक्षमतेने देशाच्या सुरक्षेसाठी काम करत आहे, त्याच परंपरेचा प्रभावी वारसा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढे नेल्याचे शिंदे म्हणाले.
अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, सुवर्ण मंदिरातील कारवाया, दहशतवादविरोधी मोहिमा, राष्ट्रीय सुरक्षा धोरण अधिक भक्कम करणे आणि पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे अंडरकव्हर एजंट म्हणून काम करणे, ही त्यांच्या राष्ट्रसेवेची तेजस्वी उदाहरणे आहेत. “राष्ट्र प्रथम” हा त्यांचा जीवनमंत्र असून अनेकजण त्यांना “भारताचे जेम्स बॉण्ड” म्हणतात. मात्र, माझ्या दृष्टीने ते भारताचे खरे धुरंधर रणनीतीकार आहेत. भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, सज्ज आणि अभेद्य करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कल्याणकारी सुराज्याची स्थापना झाली असून अमित शहा हे त्या नेतृत्वाचे सर्वात विश्वासू सहकारी असल्याचे सांगताना शिंदे यांनी मोदी-शहा यांची तुलना राम-लक्ष्मणाच्या जोडीशी केली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देत नक्षलवाद, दहशतवाद आणि देशविघातक शक्तींवर कठोर प्रहार करणारे अमित शहा, तर सीमासुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण अधिक सक्षम करणारे अजित डोवाल, या दोघांच्या समन्वयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सुरक्षित, सक्षम आणि आत्मविश्वासी राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला आहे, असे त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याच्या विचाराला आज सुराज्य आणि सुरक्षित भारताच्या संकल्पनेतून नवे बळ मिळत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेचा मजबूत पाया, सक्षम गुप्तचर यंत्रणा आणि निर्णायक राजकीय इच्छाशक्ती यांच्या बळावर भारत आज जगात नवे नेतृत्व करत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक सुरक्षा दलातील जवान, अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.”भारताची ताकद केवळ शस्त्रास्त्रांमध्ये किंवा सीमांमध्ये नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासात, राष्ट्रनिष्ठेत आणि निर्णयक्षम नेतृत्वात आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याच्या विचाराचा वारसा आज सुरक्षित, सक्षम आणि विकसित भारताच्या रूपाने पुढे नेण्याचे काम सुरू असून, भारत आता जगाला सुरक्षेचा नवा दृष्टिकोन देत आहे,” असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, लोकमान्य टिळक ट्रस्टचे पदाधिकारी, विविध मान्यवर, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
