सीजेपीचे ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियान; सप्टेंबरपासून देशभर फिरणार: अभिजित दिपके यांची घोषणा!
CJP ०६: कॉक्रोच जनता पार्टीची (CJP) दोन दिवशीय ‘कॉक्रोच कॉंकलेव्ह’ नुकतीच पार पडली. यामध्ये झालेल्या विचारमंथनानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सीजेपीचे आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर घेऊन जात असताना, येत्या सप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक?’ नावाचे एक नवे देशव्यापी कॅम्पेन सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे सीजेपीचे कार्यकर्ते देशभर फिरून जनतेच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी स्पष्ट केले की, शिक्षण मंत्र्यांचा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा केवळ एक निर्णय नसून, देशात निर्माण झालेली भीती आणि दडपशाही संपवण्याच्या दृष्टीने जनपिढीचा (Gen-Z) मोठा विजय आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या विचारधारेबद्दल सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवरच ही पार्टी चालणार आहे. भारताचे संविधान हीच सीजेपीची मुख्य विचारधारा असून पक्ष धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध राहील.येत्या काळात ही नवी मोहीम प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा; कारण आज प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च प्रचंड वाढला असून शिक्षण घेणे म्हणजे कर्जाच्या ओझ्याखाली दबण्यासारखे झाले आहे.
शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याने या आर्थिक त्रासातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मुक्त करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातील लोकशाही संस्थांची खालावलेली अवस्था सुधारणे. राजकीय, न्यायिक आणि मीडिया व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी मीडियाला स्वतंत्र आणि विश्वासार्ह बनवणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून सरकारला उत्तरदायी ठरवता येईल. याशिवाय देशातील वाढती बेरोजगारी हा तिसरा गंभीर विषय असून, पदवीधर असूनही ८० टक्के तरुण बेरोजगार आहेत आणि देशाचे भविष्य अशिक्षित घटकांकडून ठरवले जात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली!
