ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!
ठाणे

ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!

Jul 31, 2026

ठाणे, (31) : भिवंडी येथे 30 जुलै रोजी धोकादायक इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व विभाग समितींनी आपल्या कार्यक्षेत्रातील जुन्या व धोकादायक इमारतींची पुन्हा सखोल पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सी-1 प्रवर्गातील धोकादायक इमारतींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 264 अन्वये नोटिसा बजावून रहिवाशांना संभाव्य धोका समजावून सांगत इमारती तातडीने रिकाम्या करून निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. इमारती रिकाम्या करण्यापूर्वी भाडेकरू व सदनिकाधारकांच्या ताब्यातील चटई क्षेत्रफळाची मोजणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्याचेही निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिलेआहेत.

तसेच, इमारती रिकाम्या करण्यास अडथळा निर्माण झाल्यास संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात यावा. इमारत कोसळण्यापूर्वी दिसणाऱ्या धोक्याची माहिती नागरिकांना देण्यासाठी इमारतीवर इशारा फलक लावण्यात यावा. ज्या रहिवाशांकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसेल, त्यांच्यासाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या स्थलांतर शिबिरांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. याशिवाय, प्रत्येक विभाग स्तरावर तांत्रिक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक स्थापन करून धोकादायक इमारतींची नियमित तपासणी व त्याचा आढावा घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

सी-2 ए, सी-2 बी आणि सी-3 प्रवर्गातील इमारतींबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *