ठाण्यातील १२,२०० कोटींच्या अंतर्गत रिंग रूट मेट्रोला ‘वेक अप ठाणेकर’चा विरोध; २,००० कोटींत पर्यायी व्यवस्था उभारण्याचा दावा!
ठाणे वाहतूक

ठाण्यातील १२,२०० कोटींच्या अंतर्गत रिंग रूट मेट्रोला ‘वेक अप ठाणेकर’चा विरोध; २,००० कोटींत पर्यायी व्यवस्था उभारण्याचा दावा!

Aug 6, 2026

ठाणे ०६: ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२,२०० कोटी रुपयांच्या ‘अंतर्गत रिंग रूट मेट्रो प्रकल्पाला’ ‘वेक अप ठाणेकर’ या नागरिकांच्या संस्थेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प अत्यंत वेळखाऊ असून शहराच्या सध्याच्या गरजांशी सुसंगत नाही, तसेच यावर १२,२०० कोटी रुपये खर्च करूनही ठाणेकरांची वाहतूक समस्या सुटणार नाही, उलट कामांमुळे पुढील १० वर्षे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागेल, असा आरोप संस्थेने केला आहे. या प्रकल्पाऐवजी अवघ्या २,००० कोटी रुपयांत अधिक प्रभावी आणि परिणामकारक पर्याय उभा करता येऊ शकतो, असे सांगत संस्थेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना निवेदन सादर केले आहे.

या मेट्रो प्रकल्पाला पर्याय म्हणून ‘वेक अप ठाणेकर’ संस्थेने एकत्र मिळून १० महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. यात रिंग मेट्रोऐवजी २० ते ३० आसनांची क्षमता असलेल्या इलेक्ट्रिक बसेस ५ ते १० मिनिटांच्या अंतराने चालवणे समाविष्ट आहे. यासाठी ठाणे रेल्वे स्थानक – तीन हात नाका – माजिवडा – बाळकुम – कापूरबावडी – वाघबीळ – कासारवडवली असा संपूर्ण रिंग बसमार्ग विकसित करून गर्दीच्या वेळेत या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवण्याची योजना आहे. सोबतच जीपीएस आणि डिजिटल भाडे प्रणालीसह बस व मेट्रो स्थानकांवर ई-रिक्षा हब उभारणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिव्यांगस्नेही पदपथ आणि स्कायवॉक बांधणे, सार्वजनिक सायकल सुविधा उपलब्ध करणे आणि प्रमुख वाहतूक केंद्रांवर बहुविध वाहतूक व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा पर्याय मांडला आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सिग्नल व्यवस्था अद्ययावत करणे, ठाणे खाडीवरून नवी मुंबई व इतर परिसरासाठी जलद फेरी सेवा सुरू करणे आणि मोठ्या गृहनिर्माण संकुलांसह आयटी पार्कसाठी अ‍ॅप-आधारित शटल सेवा सुरू करण्याचा समावेश आहे.

या सर्व उपाययोजनांवर केवळ दोन हजार कोटी रुपयांच्या आत खर्च येईल आणि त्यामुळे राज्य शासन व ठाणे महापालिकेचे सुमारे ८,२०० कोटी रुपये वाचतील, असा दावा संस्थेने निवेदनात केला आहे. म्हणूनच या महागड्या मेट्रो प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी परिवहन तज्ज्ञ, नगररचनाकार आणि नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून या सर्व पर्यायांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात यावे, अशी ठाम मागणी ‘वेक अप ठाणेकर’तर्फे करण्यात आली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *