ठाण्यात धक्कादायक घटना: आंबे-घोसाळे तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; राबोडी पोलिसांकडून तपास सुरू!
ठाणे

ठाण्यात धक्कादायक घटना: आंबे-घोसाळे तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; राबोडी पोलिसांकडून तपास सुरू!

Aug 6, 2026

ठाणे ०६: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ठाणे पश्चिम येथील कॅसल मिल परिसरातील आंबे-घोसाळे तलावात एका अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास कॅसल मिल सर्कल, प्रभाकर हेगडे मार्ग आणि दिवंगत मीनाताई ठाकरे चौकाजवळ असलेल्या आंबे-घोसाळे तलावात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती आपत्कालीन विभागाला मिळाली. ही बातमी पसरताच स्थानिक नागरिकांनी तलावाभोवती गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ठाणे अग्निशामक दलाच्या पथकांनी पिकअप, फायर इंजिन व रेस्क्यू वाहनासह तातडीने बचाव मोहीम राबवून महिलेचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढला.अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हा मृतदेह पुढील कायदेशीर कारवाईसाठी राबोडी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. राबोडी पोलिसांनी या प्रकरणी घटनेची नोंद केली असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु केले आहे. तसेच हा मृत्यू अपघाती आहे की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *