शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनात्मक घडामोडींसोबतच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत आशावाद व्यक्त करत पक्षाला न्याय मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना दिला. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या गटाकडे जाणार नाही.
आवश्यकता भासल्यास ते चिन्ह गोठवले जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील वादावर २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, अलीकडेच या प्रकरणावर पुन्हा सुनावणी पार पडली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या सूचना देत आगामी राजकीय घडामोडींसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केल्याचेही समजते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
