राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, आता १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
ठाणे, दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे): सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने’ अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी दि. ३१ जुलै, २०२६ पर्यंत असलेली अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या पात्र साहित्यिक व कलावंतांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येत असून, कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना प्रतिमहिना रु. ५,०००/- मानधन प्रदान करण्यात येते. या योजनेद्वारे ज्येष्ठ कलावंतांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांना आर्थिक आधार देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
पात्रतेचे निकष
या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान ५० वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून दिव्यांग कलावंतांना वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. अर्जदाराने कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षे सातत्यपूर्ण योगदान दिलेले असावे. साहित्य, लोककला, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, लोकपरंपरा तसेच इतर कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कलावंतांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. तसेच वयोवृद्ध, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. केंद्र किंवा राज्य शासन, महामंडळे अथवा इतर कोणत्याही नियमित मासिक निवृत्तीवेतन किंवा पेन्शन योजनेचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक व पात्र साहित्यिक आणि कलावंतांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरून https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, अनुभवाची माहिती, योगदानाचे पुरावे तसेच उत्पन्नासंदर्भातील आवश्यक दाखले अपलोड करणे आवश्यक आहे.
“ठाणे जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेत विहित कालावधीत अर्ज सादर करावेत. कला आणि साहित्य क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असून, प्रशासनाच्या वतीने आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल,” असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.
पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यभराच्या योगदानाचा योग्य सन्मान प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणे व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
