ज. ए. इ.च्या मो. ह. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी, पं. मुकुंद मराठे यांचा विशेष सत्कार!
ठाणे शिक्षण

ज. ए. इ.च्या मो. ह. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी, पं. मुकुंद मराठे यांचा विशेष सत्कार!

Jul 30, 2026

ठाणे ३० – ज. ए. इ.चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय तसेच अभिरुची मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. मुकुंद मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संगीत रंगभूमी आणि शास्त्रीय गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारचा संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार १३ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे प्रदान होणार असल्याने विद्यालयातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज. ए. इ.चे कार्याध्यक्ष श्री. शैलेंद्र साळवी होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, ईशस्तवन आणि स्वागताने झाली. मुख्याध्यापिका सौ. सविता पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत सादर केले.यावेळी आदर्श आजी शिक्षक पुरस्कार प्रवीणकुमार जाधव, आदर्श माजी शिक्षिका पुरस्कार अनिता जाधव आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिलीप जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्तांनी विद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे पं. मुकुंद मराठे यांनी गुरुंचे जीवनातील स्थान, संस्कारांचे महत्त्व आणि ज्ञानासोबत मूल्यांची जोपासना करण्याची गरज अधोरेखित केली. “विज्ञानाने जीवनाला उंची दिली, तर संगीताने खोली दिली,” असे सांगत त्यांनी शास्त्र आणि संगीताचा सुंदर संगम उलगडला. त्यांनी भूप रागातील बंदिश सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

अध्यक्षीय भाषणात श्री. शैलेंद्र साळवी यांनी गुरूंच्या ऋणाची जाणीव ठेवून समाजोपयोगी आणि संवेदनशील नागरिक बनण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अभिरुची मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपूजन, आभारप्रदर्शन आणि वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *