शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी ३० जून २०२६ पासून सुरू असून, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू आहेत. न्यायालयाने दोन्ही पक्षांना सर्व मुद्दे एकत्रित स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या वादाची पार्श्वभूमी जून २०२२ मधील राजकीय घडामोडींमध्ये आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १० अपक्षांच्या पाठिंब्यासह शिवसेनेत मोठे बंड केले. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा करत दोन्ही गट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. आयोगाने अखेर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला, मात्र त्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर भूमिका मांडताना, गेल्या चार वर्षांपासून अंतिम निर्णय न झाल्याने पक्षांतराची प्रक्रिया सुरूच असून त्यामुळे लोकशाही व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा केला. आपण कधीही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दहाव्या अनुसूचीचा संदर्भ देत त्यांनी अलीकडील काही राजकीय घटनांचाही उल्लेख केला.
सिब्बल यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने पक्ष आणि संसदीय पक्ष या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुखांचे अधिकार महत्त्वाचे असतानाही निवडणूक आयोगाने त्याचा पुरेसा विचार केला नाही. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती, मात्र ते अनेक नेत्यांपैकी एक नेते होते, पक्षप्रमुख नव्हते, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, जून २०२२ मध्ये झालेल्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम अधिकार कोणाकडे राहणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
