सेमी इंग्रजी शाळांतील शिक्षक भरतीला दिलासा, पात्रतेच्या नियमांत राज्य सरकारची मोठी सुधारणा!
मुंबई दि.३०: राज्यातील सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केलेली असणे आता अनिवार्य राहणार नाही.
नव्या निर्णयानुसार, इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी तसेच ९ वी ते १० वीच्या सेमी इंग्रजी वर्गांसाठी शिक्षक भरती करताना उमेदवाराने मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतलेले असले तरी इंग्रजी विषयाचा अभ्यास करून संबंधित परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास त्याच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे.
यापूर्वी इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जात होते. मात्र, अशा उमेदवारांची संख्या कमी असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहत होती. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने पात्रतेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, १२ वी (विज्ञान) तसेच बी.ए./एम.ए. (इंग्रजी) किंवा बी.एस्सी./एम.एस्सी. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना, व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नसली तरी शिक्षक भरतीसाठी पात्र मानले जाणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील सेमी इंग्रजी शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यास मदत होणार असून, पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच, पात्र उमेदवारांची संख्या वाढून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्यापन उपलब्ध होण्यासही हातभार लागणार आहे!
