मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
ताज्या बातम्या शेती

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Aug 19, 2026

महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणापूर्वीच ज्या पात्र शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे.

२ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. महाआयटीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांच्या पहिल्या यादीत सुमारे १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, काही शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वीच मयत झाल्याचे बँकांच्या निदर्शनास आले होते. आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नसल्याने शासनाने या मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.या नव्या प्रक्रियेनुसार, कर्जदार शेतकरी मयत झाल्याची माहिती मिळताच बँका आपल्या प्रचलित धोरणानुसार कर्ज खात्यावर वारसांची नोंद करतील.

त्यानंतर योजनेच्या पोर्टलवर ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेद्वारे वारसांची संपूर्ण माहिती अपलोड केली जाईल. यामध्ये वारसांचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, Agri Stack Registry, CIF, बचत खाते व कर्ज खाते क्रमांक, तसेच कर्जातील वारसाचा हिस्सा यांसारख्या तपशिलांचा समावेश असेल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी ही माहिती अपलोड करण्यापूर्वी शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करणे अनिवार्य आहे.बँकांनी माहिती अपलोड केल्यानंतर महाआयटीद्वारे तिचे पुनरावलोकन करून पात्र खात्यांची नवीन यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण केले जाईल.

या प्रमाणीकरणाच्या वेळी वारसांकडे Agri Stack नोंदणी किंवा Farmer ID असणे बंधनकारक असेल. एकापेक्षा जास्त वारस असल्यास, प्रत्येकाच्या हिश्श्यानुसार कर्जमुक्तीची रक्कम खात्यात वर्ग केली जाईल; मात्र, एखादा वारस अपात्र ठरल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या कार्यप्रणालीनुसार तातडीने कार्यवाही करून पात्र वारसांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *