रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
न्यूज मुंबई

रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!

Aug 6, 2026

मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले. यामध्ये मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक प्रतिसाद लाभला आहे. चालकांच्या सोयीसाठी २०० पानांच्या अभ्यासाऐवजी दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त असा २ पानांचा सोपा अभ्यासक्रम तयार करून दुपारच्या विश्रांतीच्या वेळेत हे प्रशिक्षण देण्यात आले.

सुमारे ९८ हजार चालकांचे प्रशिक्षण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दरम्यान, अनेक चालकांचे प्रशिक्षण अद्याप अपूर्ण असल्याने प्रात्यक्षिक व व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालकांना पुरेसा वेळ आणि संधी दिल्याचे स्पष्ट करत कोणतीही मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. या प्रशिक्षण मोहिमेचा अधिकृत समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री तथा भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १८ ऑगस्टपासून विशेष पथके तैनात करून मराठीचे मूलभूत ज्ञान नसलेल्या किंवा प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *