१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!
ठळक बातम्या

१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!

Aug 6, 2026

मुंबई, दि. ६ ऑगस्ट :”महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानाच्या आढावा बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री सरनाईक म्हणाले, “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. येथे उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा, हा आमचा प्रामाणिक आग्रह आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर झाला, तर केवळ व्यवहार सुलभ होणार नाही, तर माणसामाणसांमधील आपुलकीचे बंधही अधिक दृढ होतील.”ते पुढे म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला आहे.

मराठी शिकण्याचा त्यांचा हा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठीप्रेमाला वाहिलेली खरी आदरांजली आहे.राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे. मराठी शिकण्याची ही संधी स्वीकारणारा प्रत्येक चालक हा केवळ नियमांचे पालन करणारा नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा संवेदनशील नागरिक ठरत असल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.*१७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचा समारोप*१ मेपासून सुरू झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात हजारो अमराठी चालकांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.परिवहन विभागाने सर्व उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करून व्यवहारिक मराठी आत्मसात करण्याचे आवाहन केले असून, “मराठीचा सन्मान, प्रवाशांशी आत्मीय संवाद आणि महाराष्ट्राशी भावनिक नाते” या त्रिसूत्रीवर हे अभियान अधिक व्यापकपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *