Thane: कचरावेचक विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ संस्थेचा अनोखा स्वातंत्र्य दिन सोहळा 2026!
ठाणे ताज्या बातम्या न्यूज

Thane: कचरावेचक विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ संस्थेचा अनोखा स्वातंत्र्य दिन सोहळा 2026!

Aug 16, 2026

ठाणे १६ : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष सन्माननीय श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत यंदाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कचरावेचक व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा सोहळा सामाजिक समतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा ठरला.कार्यक्रमास सन्माननीय प्रज्वलजी पाटील, सन्माननीय तेजस्विनी जाधव-सांबरे, सन्माननीय चिराग जी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असा संदेश देण्यात आला. समाजातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी आणि आर्थिक अथवा सामाजिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून जिजाऊ संस्था सातत्याने कार्यरत आहे.कचरा संकलन करणाऱ्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता “शिक्षणातून खरे स्वातंत्र्य” हा संदेश देणारा ठरला.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासाची संधी पोहोचविण्याच्या जिजाऊ संस्थेच्या कार्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून पुन्हा एकदा आला.“वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचविणे, हीच स्वातंत्र्याची खरी अनुभूती आहे,” असा सामाजिक संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *