Thane: मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची सांगता: “मराठी सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा” – एकनाथ शिंदे!
ठाणे १८ : ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’चा सांगता समारंभ पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले की, रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी ही सक्तीची नसून भक्तीची भाषा आहे. अराठी बांधवांनी स्वच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे. भाषा जपा, माणसं तोडू नका असा संदेश देत त्यांनी स्पष्ट केले की, तमिळनाडूत हिंदी येत नाही आणि इतर राज्यांत स्थानिक भाषेला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे. मराठी शिकताना अडचणी आल्यास कुणाची टिंगल न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
यावेळी त्यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी असलेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा ५० कोटींचा निधी भविष्यात १ हजार कोटींवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अभियानासाठी १ कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगत रिक्षाचालक आता केवळ व्यवहारापुरती नाही, तर साहित्यािकांसारखी मराठी बोलतील असा विश्वास व्यक्त केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “महाराष्ट्रात पोट भरा, पण मराठीचा सन्मान करा” असे स्पष्ट करत, मराठी न आल्यास आधी एक महिन्याची मुदत आणि नंतर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल असा इशारा दिला.
या अभियानासाठी एकूण १ लाख ६५ हजार ६० जणांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी १ लाख २२ हजार चालकांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ६ रिक्षा चालकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा शंभरावा वाढदिवस ठाण्यात साजरा करण्याची सूचना केली आणि सुरुवातीला झालेले ‘वंदे मातरम्’ संसदेत मंजूर नसल्याने यापुढे त्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, खा. नरेश म्हस्के, आ. रवींद्र फाटक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, अभियान समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमलता पाटील, ‘कोमसाप’च्या नमिता कीर यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते!
