ठाणे १८ -दोषसिद्धी-पत्नीला पेटवले…घरगुती वादातून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या ठाण्यातील व्यक्तीला जन्मठेप!
ठाणे, १८ ऑगस्ट – मे २०१५ मध्ये झालेल्या एका किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन तिची हत्या केल्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने मंगळवारी एका ३८ वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्यायाधीशांनी आरोपीला १,००० रुपयांचा दंडही ठोठावला.सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी आरोपी सुभाष निवृत्ती वाघमारे (३८) याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवले.
अतिरिक्त सरकारी वकील (APP) रश्मी क्षीरसागर यांनी आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी तब्बल १० साक्षीदार सादर केले.अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, ही घटना ९ मे २०१५ च्या रात्री काशिमीरा येथील घोडबंदर गावातील या दांपत्याच्या भाड्याच्या घरात घडली. वाघमारे याने आपली पत्नी वैशाली हिच्याकडे पाय दाबण्याची मागणी केली असता, तिने भांडी घासून होईपर्यंत थांबण्यास सांगितले.
तिच्या या उत्तराने रागावून वाघमारे याने तिला पाठीोपाठ ३-४ थपडा मारल्या. त्यानंतर त्या रात्री, ती वेदनेने खाटेवर बसलेली असताना, वाघमारे याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात १३ मे २०१५ रोजी ९० ते ९५ टक्के भाजलेल्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला.बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, मृताने कान आणि पोटात असह्य वेदना होत असल्याने स्वतःला जाळून घेतले होते, तसेच १० मे २०१५ रोजी नोंदवलेल्या तिच्या पहिल्या मृत्युपूर्व जबाबाकडे लक्ष वेधले.
तथापि, विशेष कार्यकारी अधिकारी गीता रॉय (PW6) आणि पोलिसांनी ११ मे २०१५ रोजी नोंदवलेल्या दुसऱ्या मृत्युपूर्व जबाबात, पीडितेने स्पष्ट केले की तिचा पती रुग्णालयात हजर असल्याने तिने सुरुवातीला भीतीपोटी खोटे सांगितले होते.या दोन परस्परविरोधी विधानांचे मूल्यमापन करताना, न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि दुसऱ्या जबाबाची विश्वासार्हता कायम ठेवली. पहिल्या विधानामागील कारणाचा उल्लेख करताना न्यायाधीशांनी शब्दशः असे निरीक्षण नोंदवले:
वैशालीने तिच्या दुसऱ्या मृत्युपूर्व जबाबात दिलेले स्पष्टीकरण सत्य आणि विश्वासार्ह वाटते. १०.०५.२०१५ रोजी मृत वैशालीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात आरोपी हजर होता आणि तिने दुसऱ्या मृत्युपूर्व जबाबात त्याचे कारण दिले आहे. त्यामुळे पहिला मृत्युपूर्व जवाबही स्पष्ट होतो… मला १०.०५.२०१५ रोजीचा पहिला मृत्युपूर्व जवाब सत्य आणि विश्वासार्ह वाटत नाही. त्यामुळे वैशालीचा मृत्यू आत्मघातकी होता हा बचाव पक्षाचा युक्तिवादही फेटाळला जातो.
पीडितेने किरकोळ शारीरिक वेदमांमुळे स्वतःला पेटवून घेतले हा बचाव पक्षाचा दावा फेटाळून लावताना न्यायालयाने शब्दशः नोंदवले. “तसेच, कानाच्या किंवा पोटाच्या दुखण्यामुळे वैशालीने स्वतःवर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले हे पटण्यासारखे नाही. त्यामुळे आरोपीचा बचाव संभाव्य वाटत नाही. उलटपक्षी, ०९/०५/२०१५ रोजी रात्री ९:०० वाजता घडलेल्या पहिल्या घटनेनंतर, वैशालीने आरोपीला भांडी घासून झाल्यावर पाय दाबेन असे सांगितल्यानंतर, आरोपी आणि वैशाली यांच्यात भांडण झाले आणि हेच कारण होते की रात्री ११:३० वाजता, वैशाली खाटेवर आरोपीच्या शेजारी बसली असताना, आरोपीने वैशालीला मारण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले.
अभियोजन पक्षाने आपला खटला संशयातीतपणे सिद्ध केला असा निष्कर्ष काढत न्यायालयाने आरोपीला १,००० रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
