Sugar Rates : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड, साखरेच्या दरात घसरण!
ताज्या बातम्या

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड, साखरेच्या दरात घसरण!

Aug 28, 2026

रक्षाबंधनाच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये जी अचानक वाढ झाली होती, त्याला आता ब्रेक लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे पूर्वी ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले साखरेचे दर आता घसरून सुमारे ४८ रुपये किलोवर आले आहेत. घाऊक बाजारात दर खाली आल्यामुळे किरकोळ बाजारातही साखरेचे भाव कमी होऊन ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ पाहता बाजारात साखरेचा तुटवडा आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय साखर संघ या दोघांनीही स्पष्ट केले आहे की, राज्य आणि देशपातळीवर साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. साठा पुरेसा असतानाही ही अचानक दरवाढ नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखाने, घाऊक व्यापारी, वितरक आणि औद्योगिक वापरासाठी मोठा साठा ठेवणाऱ्या ग्राहकांच्या साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

या मोहिमेद्वारे व्यापाऱ्यांकडे नियमानुसार साठा उपलब्ध आहे की नाही आणि बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची सखोल पडताळणी केली जाईल.गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या कौटुंबिक खर्चाचे गणित बिघडले होते. मात्र, आता घाऊक बाजारातील दर खाली आल्याने त्याचा थेट फायदा किरकोळ बाजारातही दिसून येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष साठा तपासणी मोहिमेनंतर बाजारातील या अनपेक्षित दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि साखरेचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *