Thane: टेंभा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन – जिल्हाधिकारी…महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागाची जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ मागण्यांचे निवेदन!
ठाणे : ‘टेंभा आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन येईल घेण्यात येईल. विनयभंग करण्याला तातडीने बडतर्फ केले जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही ठाणे जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह साथी छाया ठाणेकर, सह कार्यवाह साथी संगीता जांभळीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी बोलताना दिले.
शहापूर तालुक्यातील टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे २१ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या कथित गंभीर प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देण्यात आले. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला, गुरुवारी २७ ऑगस्ट २०२६ रोजी ही धक्कादायक बाब समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी महा अंनिस-ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह छाया ठाणेकर, सह कार्यवाह संगिता जांभळीकर, महा अंनिस-ठाणे शहर कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, कळवा विभाग कार्यवाह प्रमोद तामसे, संविधान जागर विभागाचे कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, सह कार्यवाह रत्नपाल जाधव, प्राचार्य जयकुमार घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.आश्रमशाळेत स्वयंपाक्याचा मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीकडून वेळोवेळी २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे.
यापूर्वीही अशा घटना घडूनही संबंधित व्यक्तीला बडतर्फ काञकेलेञगेले नाही ? या प्रश्नावर उत्तर देताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी, ‘सदर घटना दुखद असून सदर व्यक्तीविरुद्ध तत्काळ बडतर्फीची कारवाई केली जाईल’ असे स्पष्ट केले.आदीवासी समाजातील मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने चालणाऱ्या आश्रमशाळेतच अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महा अंनिसने म्हटले आहे.
“ही केवळ एका व्यक्तीच्या विकृत वर्तनाची घटना म्हणून न पाहता आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर इशारा म्हणून पाहिले पाहिजे,” अशी भूमिका महा अंनिसने घेतली आहे. संबंधित व्यक्तीला विद्यार्थिनींच्या संपर्कात येण्याची संधी कशी मिळाली, यापूर्वी तक्रारी किंवा संशयास्पद हालचाली प्रशासनाच्या निदर्शनास आल्या होत्या का आणि आल्या असल्यास त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थिनींची ओळख गोपनीय ठेवण्याची मागणीपीडित विद्यार्थिनींची ओळख, गोपनीयता आणि प्रतिष्ठा पूर्णपणे सुरक्षित ठेवावी. माध्यमे किंवा सामाजिक माध्यमांद्वारे त्यांची ओळख उघड होणार नाही, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विद्यार्थिनींना तातडीने समुपदेशन, मानसिक आधार, वैद्यकीय मदत आणि आवश्यक कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आश्रमशाळांचे सुरक्षा ऑडिट करा
जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे, महिला कर्मचारी व समुपदेशकांची उपलब्धता सुनिश्चित करावी, सुरक्षित व गोपनीय तक्रारव्यवस्था उभारावी तसेच सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची नियमित पार्श्वभूमी पडताळणी करावी, अशी मागणी महा अंनिसने केली आहे. तसेच अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासंदर्भातील कायदे, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, तक्रार करण्याचे मार्ग आणि आपत्कालीन संपर्क याबाबत विद्यार्थिनींसाठी नियमित जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात निष्पक्ष चौकशी, आरोपीवर कठोर कारवाई, प्रशासनाच्या संभाव्य हलगर्जीपणाची स्वतंत्र चौकशी, पीडितांचे संरक्षण, समुपदेशन व वैद्यकीय मदत, सुरक्षित तक्रारव्यवस्था, कर्मचारी पडताळणी, सुरक्षा ऑडिट आणि जिल्हास्तरीय कृती आराखडा अशा एकूण १२ मागण्या करण्यात आल्या आहेत!
