Ambernath: नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून पत्रकारांना रोखले; अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्याची मुजोरी चर्चेत
अंबरनाथ २० : एकीकडे अंबरनाथ शहरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पालिकेच्या नगराध्यक्षा दररोज आपल्या दालनात त्यांच्याशी संवाद साधत असतानाच नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून भाजपचेच काही कार्यकर्ते नागरिकांना रोखत असल्याचं समोर आलंय. मंगळवारी युवासेनेच्या कार्यकर्त्याने पालिकेच्या विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर त्याने नगराध्यक्षांची भेट घेतली, नगराध्यक्षांनी सुद्धा आंदोलकाचे प्रश्न ऐकून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र याच वेळी तिथं उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याने पत्रकारांना नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये जाण्यास मज्जाव केला.
भाजपचा कार्यकर्ता आशिष पावस्कर याने पत्रकारांना केबीनमध्ये जाण्यापासून अटकाव केला. असाल तुम्ही पत्रकार अशा उर्मट भाषेत त्याने पत्रकारांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. यावेळी पत्रकारांनी तुम्ही आम्हाला रोखणारे कोण असा प्रश्न विचारताच भाजपच्या कार्यकर्त्याची बोबडी बंद झाली. पालिकेची स्वतःची सुरक्षा यंत्रणा असताना भाजपच्या या कार्यकर्त्याने स्वतः खाजगीरित्या सुरक्षेची जबाबदारी घेतलीय का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.एकीकडे नगराध्यक्षा नागरिकांची भेट घेऊन त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत असतानाच भाजप कार्यकर्त्याची ही मुजोरी म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशीच म्हणावी लागेल!
