Baramati: बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; ८ महिन्यांतील तिसरी दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी नाही
बारामती ०९ : पुण्यातील बारामती विमानतळावर रविवारी दुपारी एका शिकाऊ विमानाचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, पायलट किंवा इतर कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. अपघात नेमका कशामुळे झाला यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे, बारामतीमध्ये मागील आठ महिन्यांतील हा तिसरा विमान अपघात ठरला आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे लियरजेट चार्टर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात गोजुबावी गावाच्या हद्दीत एका शिकाऊ विमानाने शेतात इमर्जन्सी लँडिंग करताना दुसरा अपघात घडला होता. आता पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडल्याने विमानतळ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून हवाई प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे!
