Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!
ताज्या बातम्या राजकारण

Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Aug 30, 2026

परभणी ३० : एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ही सभा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, हा कार्यक्रम दोन महिने आधीच निश्चित झालेला असल्याने तो रद्द करणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले होते. यावरूनच सभास्थळी मराठा आंदोलक अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सभास्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होताच आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या विरोधामुळे सभेच्या ठिकाणी पोलिसांची मोठी धावपळ उडाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान राखत पोलिसांना “काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवर आणा” अशा सूचना दिल्या. यामुळे सभास्थळी काही काळ या विषयाची जोरदार चर्चा रंगली.

या संपूर्ण घटनेवरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ५० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले असून, सभास्थळी सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवण्यात आली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *