Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील भोंगळ कारभार आणि बाल खेळाडूंच्या अपमानाचा जाहीर निषेध – केदार दिघे!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील भोंगळ कारभार आणि बाल खेळाडूंच्या अपमानाचा जाहीर निषेध – केदार दिघे!

Aug 30, 2026

ठाणे ३० : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर वर्षा मॅरेथॉन’मध्ये झालेल्या अत्यंत लाजीरवाण्या प्रकाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.आज राज्यामध्ये सर्वच स्तरांवर असंतोषाचे वातावरण आहे. खराब रस्ते, कचऱ्याचे ढीग, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि शिक्षक-विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न यामुळे जनता आधीच त्रस्त आहे. असे असताना आता क्रीडा क्षेत्रात आणि तेही लहान मुलांच्या बाबतीत झालेला हा निष्काळजीपणा म्हणजे प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस असल्याची टीका केदार दिघे यांनी केली.

मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या लहान मुलांनी आपलं कसब दाखवत स्पर्धा पूर्ण केली. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना त्यांचे हक्काचे पदकही प्रशासनाला देता आले नाही. स्वतःच्या हक्कासाठी या लहान मुलांना भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करावे लागले, ही बाब ठाण्याच्या संस्कृतीला आणि क्रीडा जगताला काळिमा फासणारी असल्याचे दिघे यांनी म्हटले आहे.सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन केवळ इव्हेंटबाजी आणि जाहिरातबाजीत मग्न असून, प्रत्यक्ष मैदानावर मात्र खेळाडूंची थट्टा उडवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाणे महानगरपालिकेने या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. हा ढिसाळ कारभार नेमका कोणामुळे झाला, याची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे.तसेच, सर्व लहान खेळाडूंची जाहीर माफी मागून त्यांना त्यांचे हक्काचे सन्मानचिन्ह सन्मानाने घरपोच करण्यात यावे. प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केल्यास या भोंगळ कारभाराविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही केदार दिघे यांनी दिला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *